भारताचा स्वातंत्र्यदिन नक्की कोणता?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि भारत हा स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून उदयास आला, असे आपल्याला बालपणापासून शिकवण्यात आले आहे. आताही शाळा-शाळांतून विद्यार्थ्यांना असेच शिकवण्यात येत असते. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात आपण जसजसे खोलात जातो तसतसे आपणाला वेगळेच चित्र दिसून येते आणि आपला भ्रमनिरास होऊ लागतो.
आपल्या मुलभूत हाकांचा उपयोग करता येणे आणि त्याद्वारे आपल्या इच्छेनुरूप स्वतःचा अधिकतम विकास करता येणे यासाठी आवश्यक अशी परिस्थिती असणे म्हणजे स्वातंत्र्य! मात्र भारतातील परिस्थिती इतकी भयानक आहे की येथे आपल्या आणि दुसऱ्यांच्या मुलभूत आणि इतर हक्कांची तसेच कर्तव्यांची जाणीव व त्याचे शिक्षण अतिशय कमी आहे. जनतेच्या विविध हक्कांची सर्रास पायमल्ली सुरु आहे, त्याउलट हक्कांच्या लढ्यांचा आवाज अतिशय क्षीण आहे. जनता हतबल, नाईलाज व निरुपाय झाल्यासारखी होऊन त्याला बळी पडते आहे आणि कशीबशी परिस्थितीशी जुळवून घेऊन तडजोडीचे आयुष्य ढकलीत आहे. त्यामुळे काही मोजक्या लोकांचा भरमसाट विकास झालेला दिसतो; तर दुसरीकडे बहुजन जनता शोषण, दारिद्र्य, अज्ञान अशा परिस्थितीत खितपत पडलेली आहे. या दृष्टीने पहिले तर १५ ऑगस्ट १९४७ लाच काय १५ ऑगस्ट २०१५ ला सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असे म्हणता येत नाही.
इतर दृष्टीने बघितले तर १५ ऑगस्ट १९४७ ला भारत पूर्णपणे स्वतंत्र, सार्वभौम व प्रजासत्ताक राष्ट्र बनले नव्हते. भौगोलिक दृष्ट्याही १५ ऑगस्ट १९४७ चा भारत आजच्या भारतासारखा नव्हता. मग त्या दिवशी नक्की झाले तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो. त्याच्या उत्तरासाठी आपण जरा इतिहासात डोकावून पाहू…
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात सर्वसाधारणपणे १८५७ च्या बंडापासून झाली असे समजले जाते. परंतु ते बंड आपापली राज्ये, संस्थाने टिकवण्यासाठी फोफावले होते. भारत नावाचा देश व त्याचे सर्वंकष स्वातंत्र्य याची पुसटशीही इच्छा व जाणीवही त्यावेळच्या बंडकर्त्यांमध्ये नव्हती. निव्वळ इंग्रजांच्या विरोधात लढणे म्हणजे स्वातंत्र्ययुद्ध अशी सरधोपट व्याख्या करणे धोक्याचे आहे. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हीसुद्धा इंग्रजांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी स्थापन झाली होती.
जगभर पसरलेल्या अवाढव्य साम्राज्यावर आपण कायम अंकुश ठेऊ शकणार नाही, याची जाणीव पहिल्या महायुद्धातील धक्क्यांनंतर इंग्रजांना झाली होती. तसेच शिक्षणामुळे जागृत झालेल्या भारतीयांमुळे सुद्धा येथे राज्य करणे त्याना कठीण जाणार होते. त्यामुळे स्वतःचा फायदा होत राहील यादृष्टीने दूरवरून विविध प्रकारे भारतावर नियंत्रण ठेवण्याची तजवीज करून भारत सोडून जाण्याची सुरुवात इंग्रजांनी पहिल्या महायुद्धानंतर केली होती. १९३५ चा ब्रिटीश इंडिया एक्ट, गोलमेज परिषदा, सायमन कमिशन हे त्या प्रयत्नांचे भाग होते. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांची परिस्थिती खूपच खालावल्यामुळे त्यांनी भारत सोडून जाण्याची अक्षरश: घाई करणे सुरु केले. त्यामुळे घटना बनवा तेही शक्य नसेल तर घटनेचा मसुदा बनवा आणि स्वातंत्र्य घ्या, अशी उतावीळ भूमिकाच त्यांनी घेतली. पण हिंदू-मुस्लीम वादात भारताचा तोडगा निघत नव्हता आणि विलंब होत होता. इंग्रज कोणत्याही सर्वसामान्य अति मान्य करून स्वातंत्र्य देण्याच्या घाईत होते.
तशातच मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी एकसंध भारताच्या फेडरेशनची योजनासुद्धा इंग्रजांनी मान्य करून घेतली होती. आश्चर्य म्हणजे त्यावर कॉंग्रेस आणि मुस्लीम लीग यांनी सहमतीच्या सह्या सुद्धा केल्या होत्या.परंतु त्यानंतर पंडित नेहरूंनी ती योजना अमान्य केल्याचे जाहीर केल्याने पुन्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. स्वत:च्या फायद्याचे विविध करारनामे करून भारत-पाक वर आपला अंकुश राहील याची पुरेशी सोय करून १४-१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत-पाकला मर्यादित स्वातंत्र्य बहाल करण्यात आले.
१५ ऑगस्ट १९४७ ला या देशाला इंग्रजांच्या स्वायत्त वसाहतीचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे याचे नाव (ब्रिटीश) दोमेनियान ऑफ इंडिया असे झाले. भारताचा प्रमुख हा इंग्लंडचा राजाच राहिला. येथील अधिकृत राष्ट्रगीत “गॉड सेव्ह द किंग” हे होते. यानंतर भारताला ब्रिटीश कॉमनवेल्थ (ब्रिटीश अधिसत्ता) चा कायमरुपी सदस्य व्हावे लागले. व त्याचे कायमस्वरूपी अध्यक्षपद ब्रिटनच्या राजा/राणी कडे ठेवण्यात आले. त्यांचा येथील प्रतिनिधी म्हणून लॉर्ड माउंटबॅंटन यांना नियुक्त करण्यात आले. त्यांच्यानंतर आलेले गव्हर्नर राजगोपालाचारी पदाची शपथ घेताना राजा सहावा जॉर्ज यांच्याशी एकनिष्ठ शपथ घ्यावी लागली होती.
या सर्व गोष्टी बघता, १५ ऑगस्ट या दिवसाला स्वातंत्र्य दिन म्हणता येत नाही. हवे तर सत्तांतर दिन म्हणता येईल. म्हणजेच या दिवशी ब्रिटीशांकडून भारतातील प्रतिनिधींकडे मर्यादित सत्ता सोपविण्यात आली. अंतिमत: सर्वोच्च अधिकारी ब्रिटीशच राहिले. या बदलाचे पडद्यामागचे सूत्रधार व्ही के मेनन यांनी या बदलाचे वर्णन “ट्रान्सफर ऑफ पॉवर” या यथार्थ शब्दांत करून त्यावर प्रसिद्ध पुस्तकही लिहिले आहे.
असल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत गोलमेज परिषद, सायमन कमिशन, संविधान यांचा सुमारे २० वर्षांचा गाढा अभ्यास असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक योगदानाने शेवटी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान तयार झाले. २६ जानेवारी १९५० पासून त्याचा अंमल सुरु झाला. त्यामुळे भारत “रिपब्लिक ऑफ इंडिया” बनला. अनेक मर्यादा दूर झाल्या. भारताला जास्त व्यापक सार्वभौमत्व प्राप्त झाले.
तथापि १९४७ च्या सत्तांतराच्या दरम्यान भारत आणि इंग्लंड यांचे दरम्यान ब्रिटीशांच्या फायद्याचे अनेक करार-मदार झालेत, ते अद्यापही कार्यान्वित आणि लागू आहेत. त्यातून भारताची सुटका होईल तेव्हा आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले असे काहीसे म्हणता येईल. तोपर्यंत १५ ऑगस्ट हा दिवस “सत्तांतर दिवस” म्हणून साजरा करण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही.
– लेखक:- धनंजय आदित्य.
http://www.adityasir.wordpress.com
http://facebook.com/adityasir

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s