दळभद्री नावांची अघोरी परंपरा!

लहानपणी प्राथमिक शाळेतील माझ्या वर्गातील एका मुलाचे नाव उकीरडा होते। उकीरडा म्हणजे घरातील केर-कचरा, उष्टे-खरकटे, शेण-मूत इत्यादी टाकाऊ पदार्थ टाकण्याची जागा। त्याचप्रमाणे दगड्या, चिंधी, कचरू अशी मित्रमंडळी सुद्धा होती।

खरे तर नाव म्हणजे आई-वडिलांकडून मुलांना देण्यात येणारी अमूल्य देणगी आहे। ही देणगी मुलांना आयुष्यभर पुरते। नाव हे व्यक्तिमत्वचा महत्वाचा भाग बनून जाते। ते जीवनाची ओळख बनते। असे असतांना पालक मुलांची नावे दळभद्री, घाणेरडी, निंदाजनक, शिव्या दिल्यासारखी का बरे ठेवत असावीत? असा प्रश्न तेव्हाही पडत होता।

बऱ्याच वर्षानंन्तर त्याचा उलगडा होत गेला। या देशातील, येथील संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट जात, वर्ण यांच्याशी निगडित आहे। किंवा प्रत्येक गोष्टीत जातिव्यवस्थेचे विष भिनलेले आहे। त्याचप्रमाणे निन्दाजनक नावे ठेवण्यामागे जातिव्यवस्थेची पाळेमुळे जबाबदार आहेत असे दिसून येते। विशेष म्हणजे असला विचित्र प्रकार आपल्या भारतातच झालेला आहे।

जातिव्यवस्था रुजविणारा सैतानी ग्रंथ म्हणजे मनुस्मृती। त्यामध्ये स्पष्टच म्हटले आहे की-

ब्राम्हणाचे नाव मंगलवाचक, क्षत्रियांचे नाव बलवाचक, वैश्याचे नाव धन-धान्य सूचक, शुद्राचे नाव निंदासूचक ठेवावे। (मनुस्मृती अध्याय 2, श्लोक 31)

असे नाव असले की आपसुकच त्याना स्वतःचा, स्वतःच्या नावाचा, स्वतःच्या व्यक्तिमत्वचा कमीपणा वाटत राहील। त्यांच्या आयुष्यभर न्यूनगंडाची भावना जोपसली जाईल, याची पुरेशी तजवीज या नियमांनी करून ठेवली होती। तसेच फक्त नावावरून तो कोणत्या जातीचा/ वर्णाचा आहे याचा बोध व्हावा हाही उद्देश त्यात होता।

कोणी काहीही सांगितले म्हणजे लोक तसे वागतीलच असे नाही। त्या कृतिमागचे तर्कशास्त्र किंवा तर्कटशास्त्र त्याला पटवून द्यावे लागते। या प्रकरणी सुद्धा असे भयानक तर्कट रचले गेले व लोकांच्या गळी उतरविले गेले।

मागील जन्मातील पापांमुळे खालच्या जातीत जन्म मिळतो हे येथील कर्मविपाक सिद्धांताने व ग्रन्थ, कथा-कहाण्या, काव्ये इत्यादी तून समाजात रुजवले गेले होते। मग पुढच्या जन्मी उच्च जातीत जन्म मिळावा यासाठी मागच्या जन्मीचे पाप पूर्ण नष्ट होऊन पुण्याचा संचय होणे आवश्यक होते। लोकांनी जर निन्दाजनक नावाने पुन्हा पुन्हा संबोधले तर मागच्या जन्मीचे पाप हळूहळू कमी होऊ लागेल। पुण्यात्मा बनण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होईल। अशी समजूत लोकांच्या गळी उतरवल्या वर पाप धुण्याची संधी कोण सोडणार? आपल्या मुलाना पुढच्या जन्मी चांगल्या जातीत जन्माला घालण्याची संधी कोण सोडणार? शिवाय शुद्राने चांगले नाव ठेवतो म्हटले तर भटशाहीचा वरवंटा फिरण्याची भीती होतीच। अशा प्रकारे निंदाजनक नावे ठेवण्याची परंपरा लोकांनी बेमालूमपणे उचलली।

ब्राम्हणांची उपनामे/ आडनावे शर्मा यासारखी, तर शुद्राचे उपनाम दास(गुलाम) याप्रकारचे असावे- असेही मनुस्मृतीने (अध्याय2, श्लोक 32) सांगून ठेवले होते। पिढ्यान पिढ्या, शतकानु शतके हा प्रकार सुरु राहिला। अगदी संत रामदाससुद्धा शूद्रांची नावे निन्दाजनक ठेवावी अशा विचारांचे होते। दासबोधात ते म्हणतात-

मातंगीचे नाम तुळशी।

चार्मिकेचे नाम काशी।

बोलती अतिशुद्रीणीसी।

भागीरथी ऐसे।।स10,द14,श्लो15

अर्थात मांगाच्या मुलीचे नाव तुळशी ठेवणे, चाम्भाराच्या मुलीचे नाव काशी ठेवणे, अतिशूद्र स्त्रीचे नाव भागीरथी असे ठेवणे त्यांना गैर वाटते।  हे म्हणजे कुत्र्याला वाघ असे नाव ठेवण्यासारखे (सुण्यास व्याघ्रनाम ठेविलें। श्लो13) त्याना विचित्र वाटते।

आता समाज जागृत होत आहे। लोकांना स्वाभिमानाची जाणीव होऊ लागली आहे। मनुस्मृती सारख्या धोकादायक ग्रंथाला नाकारून मुलांची नावे चोखंदळ पणे ठेवली जात आहेत। अपमानित नावे कालबाह्य होत आहेत। आता उरली सुरली निंद्य नावेसुद्धा गाडून टाकण्यासाठी प्रयत्न करू या।

तथापि अवमानजनक आड़नावांचा मुद्दा जास्तच चिकटून बसला आहे। लोकांच्या जाती ओळखण्यासाठी त्यांचा बराच उपयोग/दुरुपयोग होत आहे। आडनावे कितीही निंदाजनक, शिव्या दिल्यासारखी असली तरी ती सोडण्याची इच्छा लोकांना होत नाही हे एक आश्चर्य आहे। नावातील गुलामीची लोकांना प्रखरतेने जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत लोक त्या गुलामीचे लोढणे फेकून देणार नाहीत। हे जोखड़ सोडवण्यासाठी निश्चित धैर्याची गरज आहे। काळाची ती गरजही आहे।

Advertisements